Together …. We Can!

Only registered association of Teaching and Non Teaching employees of Technical / Pharmacy / MBA institutes in the state of Maharashtra

About Us

विनाअनुदानीत तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचान्यांना समजामध्ये सन्मानाने जगता यावे, हया तंत्रशिक्षण संस्थांची दर्जात्मक व गुणात्मक वाढ व्हावी व काही ठिकाणी विद्यार्थी- पालकांच्या हतबलतेचा गैरफायदा घेऊन त्यांची होणारी लूट थांबावी ह्या करता टिचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्नीक्स (टॅफनॅप) ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत आहे. टिचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफनॅप) ही संघटना संपुर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणारी एकमात्र नोंदणीकृत संघटना आहे. विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील अनेक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी टॅफनॅपने आजपर्यंत आंदोलन, निदर्शने व न्यायालयीन मार्गाने सातत्याने लढा दिलेला आहे. अल्पावधितच संगमनेर, अहमदनगर, चांदवड, फैजपुर, धुळे, जळगाव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, मालेगाव, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, औरंगाबाद, यवतमाळ, अकोला, अमरावती, सोलापूर, साखराळे, इचलकरंजी व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कधी सामोपचाराने, कधी शांततापूर्ण आंदोलनाच्या मार्गाने तर कधी न्यायालयीन लढा देऊन टॅफनॅपने विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये स्पृहणीय यश मिळवले आहे.

Read More

News and Announcement

शुल्क निर्धारण प्राधिकरणाचे अध्यक्ष रिटायर जज्ज विजय अचालिया यांच्याबरोबर संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.TAFNAP, मुक्ता व सारती संघटनेची प्रमुख मागणी सर्व संस्थांचे फि निर्धारणाचे प्रस्ताव त्यांनी वेबसाईटवर टाकले पाहिजेत याबद्दल कारवाई करण्याचे आश्वासन प्राधिकरणाच्या सर्व सदस्यांनी दिले. आपणा सर्वांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले. शेवटी TAFNAP चे ध्येय वाक्यच आहे Together… We Can.

मित्रांनो…

मंगळवार दि. ९ जुलै २०२४ रोजी शुल्क नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष व इतर सदस्य यांचे बरोबर टॅफनॅप, मुक्ता व इतर समविचारी संघटनांच्या सदस्यांची बैठक झाली. ह्या बैठकीनंतर आज जवळपास साडेचार महिन्यांनंतरही शुल्क नियामक प्राधिकरणा कडून कोणतहीही ठोस कृती झाल्याचे दिसून येत नाही.

ह्या संदर्भात आपणां सर्वांशी चर्चा करून ह्या लढ्याची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता आपण एक झूम / गुगल मिटिंग आयोजित करीत आहोत. ह्या मिटिंगमध्ये प्रा. राम यादव “भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक शिक्षण शुल्क समिती” या राज्यव्यापी आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट करतील. प्रा. डॉ. सुभाष आठवले सर देखील आपल्याला मार्गदर्शन करतील.

शुल्क नियामक प्राधिकरणाशी संबंधित विभागांशी पत्रव्यवहार व तक्रारी, आझाद मैदान येथे व्यापक आंदोलन, जनहित याचिका, लोकप्रतिनिधी / आमदारां मार्फत ह्या प्रश्नांबाबत विधान सभेत आवाज उठवणे अशा अनेक माध्यमांतून आपण हा लढा पुढे नेणार आहोत. हा लढा यशस्वी करणे ही आपणां सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.

मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वाजता आपण ह्या महत्वाच्या झूम / गुगल मिटिंगला हजर रहावे ही विनंती. ह्या मिटिंगची लिंक मी TAFNAP ग्रुपवर टाकत आहे. ह्या ग्रुपवर नसणाऱ्या सदस्यांना देखील आपण ह्या महत्वाच्या मिटिंगबाबत कल्पना द्यावी.

रामने सुरू केलेला हा लढा आपल्याला टोकापर्यंत न्यायचा आहे. तुमच्या सर्वांचे “सक्रिय” सहकार्य अपेक्षित आहे, कारण टॅफनॅपचे ब्रीदवाक्यच आहे “Together… We Can!”

प्रा. श्रीधर वैद्य

Please watch Ram Yadav Sir’s interview regarding FRA here
please Share this link to as many people as possible.

मित्रांनो…

आपल्या राज्य अधिवेशनाची सांगता करून काल कोल्हापूरला परत आलो.

अधिवेशनाचे दोन दिवस हे आपल्या सर्वांकरताच अक्षरश: मंतरलेले दिवस होते. अनेक दिग्गजांचे मार्गदर्शन, विविध विषयांवरची चर्चासत्रे, महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या टॅफनॅपच्या सदस्यांचा एकमेकांशी परिचय, एकमेकांच्या वेदना आणि दिलेले लढे समजावून घेताना मिळालेली एक उभारी, अन्याय आणि भ्रष्टाचारा विरुद्धच्या लढ्यात आपण एकटे नाही तर अख्खा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे हा मिळालेला विश्वास, परिवर्तनच्या माध्यमातून संघटनेचे प्रबोधनाचे काम, संघटनेच्या वेबसाईटमुळे सर्वांना तत्परतेने उपलब्ध होणारा माहितीचा खजिना ह्या सर्व आपल्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या उपलब्धी. अधिवेशनाच्या शेवटी आपण एकमताने मंजूर केलेले ठराव आणि आता त्या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी आखलेला कृती कार्यक्रम आपल्याला आपल्या अंतिम ध्येयापर्यंत घेवून जाणार आहे.

अधिवेशनासाठी जे सदस्य उपस्थित राहिले त्याचे कौतुक आहेच पण जे सदस्य विविध कारणांमुळे येवू शकले नाहीत ह्या सदस्यांचे विशेष आभार. अजूनही टॅफनॅपचे काम कमी पडतेय त्यामुळे अधिवेशनाला न येता घरची तातडीची कामे आपल्या सदस्यांना महत्वाची वाटतात ही माझ्यासाठी आत्मचिंतनाची बाब आहे. तुमच्यामुळे आम्हा सगळ्यांना अधिक काम करायची प्रेरणा मिळाली हे मला नमूद करावेसे वाटते.

अधिवेशन यशस्वी करण्यासाठी झिल इंजिनीयरिंग, पी.सी.पी., तळेगाव आणि एम.एम.पी.च्या सदस्यांनी हे अधिवेशन म्हणजे आपल्या घरचेच कार्य असल्यासारखे समजून घेतलेली मेहनत सर्वांच्याच स्मरणात राहील. सचिन शिंदे, काळे मॅडम, गौरी जाधव, राम यादव, प्रदीप पाटील, राजू गायकवाड, खांडेकर सर आणि त्यांची सर्व टीम, प्रा. दीपक शिरभाते, प्रा. विश्वकर्मा, प्रा. जीवन पाटील, अद्वैत देशमुख, चैतन्य, अक्षय हे सगळे ह्या यशस्वी अधिवेशनाच्या पडद्यामागचे कलाकार. त्यांच्या ऋणातच राहणे आपण पसंद करू.

आपल्यावर होणार अन्याय व तंत्रशिक्षण व्यवस्थेमधील भ्रष्टाचार ह्याचा नेटाने सामना करण्यासाठी आपण हा गोवर्धन पर्वत उचलला आहे. टॅफनॅपच्या प्रत्येक छोट्यामोठ्या सदस्याने हा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी योगदान दिलेले आहे. मला खात्री आहे की आपल्या लढ्याचे अंतिम यश हे आपलेच आहे. कारण टॅफनॅपचे ब्रीदवाक्यच आहे “Together… We Can !”